Tuesday, 22 January 2013

सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकारांनी करावे - जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे 

21 जानेवारी 2013

रायगड : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेमधून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी केले.
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रम श्री जागेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात ना.तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दैनिक कृषिवलचे संपादक संजय आवटे, मठाधिपती आण्णासाहेब म्हस्के, जगदीश गायकवाड, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच निलोफर पानसरे, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष महेश पवार, कार्याध्यक्ष शामकांत नेरपगार आदी उपस्थित होते.
श्री. तटकरे म्हणाले, बाळशात्री जांभेकर यांनी प्रखर राष्ट्रभक्तीने आपल्या दर्पण या वृत्तपत्रातून लिखाण केले. लोकमान्य टिळक व आगरकर यांचे अग्रलेख उत्तम होते. नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनने पत्रकारांकरिता विविध कल्याणकारी उपक्रम राबविले. सध्या वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे. तसेच वाचकांचीही संख्या वाढत आहे.
दैनिक कृषिवलचे संपादक श्री. आवटे, श्री. गायकवाड, सुभाष म्हात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्री. तटकरे यांच्या हस्ते दैनिक सकाळचे उपसंपादक सुभाष म्हात्रे यांना कै.तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, माणगाव येथील दैनिक रायगड टाईम्सचे प्रतिनिधी सलीम शेख यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, दैनिक सागरचे खांब येथील पत्रकार नंदकुमार मरवडे यांना युवा पत्रकार पुरस्कार आणि मुरुड येथील वृत्तपत्र छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment